१८व्‍या महाराष्ट्र महापौर परिषदेचे थाटात उद्‌घाटन

Date:

नागपूर : आजच्या २१ व्‍या शतकात आपल्यापुढील सर्वात मोठे आव्‍हान अस्तित्वाचे आहे. वातावरणाच्या बदलाने जगात परिवर्तन होत आहे. यावर नियंत्रण मिळविणेही आपल्याच हातात आहे. आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर न केल्यास, त्याचे योग्य व्‍यवस्थापन न केल्यास आपणच आपल्यावर संकट ओढवून घेणार आहोत. आज आपण प्रदुषणमुक्त, पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची संकल्पना मांडतो. मात्र आपल्या शहरात जर घनकचरा व सांडपाण्याचे योग्य व्‍यवस्थापन होत नसेल तर मूल्यमापनात आपण शून्य ठरतो. प्रदुषणमुक्त शहर हवे असेल तर आपण स्वत:च निर्माण केलेल्या कचऱ्याचे योग्य व्‍यवस्थापन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

१८व्‍या महाराष्ट्र महापौर परिषदेचे शनिवारी (ता. २७) वनामती येथील वसंतराव नाईक सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात उद्‌घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, जोगेंद्र कवाडे, महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिषदेच्या उपाध्यक्ष व नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संयोजक व महाराष्ट्र महापौर परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज शाश्वत विकासाची रुजवणूक करण्याची आवश्यकता आहे. वातावरणाच्या बदलावर आपण कोणतिही कारवाई न केल्यास येत्या १० ते २० वर्षात जगाचे तापमान २ अंशाने वाढणार आहे. त्यामुळे पूर्णत: नैसर्गिक समतोल ढासळेल. नुकत्याच पॅरिस येथे झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाश्वत विकासाबाबत खंबीर भूमिका मांडली. पंतप्रधानांनी शाश्वत विकासाचे काही संदर्भ स्वीकारून २०३० पर्यंत भारत यामध्ये पुढाकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने आपण काम करणे आवश्यक आहे. १८व्‍या महाराष्ट्र महापौर परिषदेच्या निमित्ताने शाश्वत विकास या विषयावर चर्चा होणे अभिनंदनीय आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सिवरेजच्या ‘नागपूर मॉडेल’चा स्वीकार करा

आज नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला सांडपाणी दिल्याने त्यातून नागपूर महानगरपालिकेला चांगले उत्पन्न मिळत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या या ‘नागपूर सिवरेज मॉडेल’चा प्रत्येक महानगरपालिकेने स्वीकार करावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांडपाण्यातून वीज निर्मिती शक्य असल्याने मुंबईसारख्या शहरात समुद्राला जोडलेल्या सिवरेज लाईन बंद करून त्याचा उपयोग करून मनपाला नफा कमविता येईल. प्रत्येक शहराचा विकास आराखडा हा त्या शहराचा मार्गदर्शक अहवाल असतो. प्रत्येकाने त्याचा अभ्यास करून त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. महानगरपालिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना कार्यरत आहेत. त्याचा उपयोग घेता यायला हवा. महानगरपालिकांना आधी वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यात येणारा निधी १२०० कोटी होता तो वाढून आता ३२०० कोटी करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कार्यक्रमात महाराष्ट्र महापौर परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना महापौरांच्या अधिकारवाढीबाबत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचे समर्थन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रशासन व लोकप्रतिनिधी ही दोन महत्त्वाची चाके आहेत व त्यांनी एकत्र येऊन काम करणे यातच विकासाचे गमक आहे. प्रत्येकांनी आपापले अधिकार, क्षमता व मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेतल्यास आपल्याला आपल्याच अधिकाराचा अमर्याद वापर करता येतो. महापौरांना जादाचे वित्तीय अधिकार हवे असल्यास त्यांनी नियमीत निधी पेक्षा अतिरिक्त निधी जमा केल्यास शासनातर्फे त्याचा १० टक्के थेट महापौर निधीमध्ये जमा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले.

उत्पन्न वाढीची उदासीनता सोडा, संसाधनांचा वापर वाढवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महानगरपालिकांमध्ये ९० टक्के वेळ हा खर्च कसा करायचा यावर जातो. उत्पन्न घेऊन निधी कसा वाढेल हा कोणत्याही महानगरपालिकेचा अजेंडाच नाही. आपल्याकडे उपलब्ध संसाधनावरूनही आपण उत्पन्न मिळवू शकतो तशी तयारी मात्र महानगरपालिकांनी ठेवणे आवश्यक आहे. डांबराचे रस्ते तयार करताना त्यामध्ये टाकाऊ प्लास्टिक, टाकाऊ रबर व काचेचे पावडर मिश्रित केल्यास आपला कचऱ्याचा प्रश्नही सुटेल. डांबराचे दर ४५ रुपये प्रति किलो आहे तर टाकाऊ कचऱ्याचा दर १२ रुपये प्रति किलो आहे. रस्त्याच्या डांबरामध्ये हा कचरा मिश्रित केल्यास आपला बराच पैसाही वाचेल या दृष्टीने विचार केल्यास मनपाचे उत्पन्नही वाढेल, असा मंत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

प्रत्येक महानगरपालिकेमध्ये घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टींना आपण सर्वात शेवटी ठेवतो, मात्र आपल्या शहराच्या शाश्वत विकासासाठी या गोष्टींनाच प्राधान्य देण्याची गरज आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आज मनपाकडे निधीची कमतरता आहे म्हणून ओरड होते. नागपूर मेट्रोला नागपूर महानगरपालिकेकडून रक्कम द्यायची आहे. मात्र निधी नसल्याने त्यावर सुद्धा उपाय शोधून काढण्यात आला आहे. शहरातील मोठे मार्केट मेट्रोला देऊन ते अद्ययावत करून त्यातून मनपाला २५० ते ३०० कोटी वर्षाला उत्पन्न घेता येईल. मेट्रोचे स्टेशन नागपूर शहराचे विकासाचे शिलेदार ठरणार आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. शहरातील नागरिकांना कमी पैशामध्ये उत्तम प्रवास साधन व प्रदुषणमुक्त जीवन द्यायचे असेल तर, इलेक्ट्रॉनिक सार्वजनिक वाहनांची गरज आहे. सौर ऊर्जेच्या मार्फत आज सुरेश भट सभागृहात पाच हजार रुपयांमध्ये कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले जात आहे. काही ना काही मार्ग काढून जनतेचे जीवन सुकर होईल, हा एक उद्देश डोळ्यासमोर सदैव ठेवा. आपले शहर स्वच्छ व सुंदर करून जनतेला शाश्वत विकास मिळवून द्या, असा मंत्रही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित महापौरांना दिला.

स्वागत भाषणात महापौर नंदा जिचकार यांनी शहरातील विविध विकास कामांची माहिती दिली. महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले तर आभार परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्‍हाण यांनी मानले. यानंतर सर्व महापौरांची बैठक झाली. यामध्ये त्यांनी शाश्वत विकासासंदर्भात मंथन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान सांगितलेल्या मुद्यांवरही चर्चा केली. या बैठकीत काही ठरावही संमत करण्यात आले. महापौर परिषदेत सहभागी झालेल्या महापौरांचा सत्कार नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

‘सारथी’, ‘महापौर’चे प्रकाशन

महानगरपालिकांमध्ये महिलांच्या उत्थानासाठी असलेल्या निधीचा वापर कशा प्रकारे करावा यावर आधारीत ‘सारथी’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र महापौर परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके हे या पुस्तकाचे लेखक आहेत. महापौर नंदा जिचकार यांच्या महापौर पदाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘महापौर’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

१९ महापौरांची उपस्थिती

नागपुरात पहिल्यांदाच होत असलेल्या महाराष्ट्र महापौर परिषदेला राज्यातील १९ महापौरांनी उपस्थिती दर्शविली व शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, मिरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, सांगली मिरज कुपवाडच्या महापौर संगीता खोत, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, अमरावतीचे महापौर संजय नरवणे, लातूरचे महापौर सुरेश पवार, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, मालेगावचे महापौर शेख रशीद शेख शफी, भिवंडी निजामपूरचे महापौर जावेद गुलाम मोहम्मद दळवी, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, परभणीच्या महापौर मिना बरपुडकर, जळगावच्या महापौर सीमा भोळे, कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंदे, वसई विरारचे महापौर रूपेश सुदाम जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल प्रामुख्याने परिषदेला उपस्थित होते.

शहरातील विकास कामांची महापौरांनी केली पाहणी

राज्यातील १९ वेगवेगळ्या शहरातून आलेल्या सर्व महापौरांनी यावेळी शहरातील विविध स्थळांना भेट देऊन शहरातील विकास कामांची माहिती जाणून घेतली. नागपूर शहरात स्वनियंत्रण प्रणालीद्वारे नागरिकांची सुरक्षा राखणा-या मनपा मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ला यावेळी महापौरांनी भेट दिली. शहरात विविध ठिकाणी सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांमुळे शहरात राखली जाणारी सुरक्षा, वेळीच गरजूंना केली जाणारी मदत व नैसर्गिक आपत्तीच्यावेळी करण्यात आलेल्या सुरक्षेची संपूर्ण माहिती व्‍हिडीओच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने यांनी यावेळी दिली. यानंतर सर्व मान्यवरांनी देशातील सर्वात मोठे सांस्कृतिक सभागृह म्हणून नावारुपास आलेल्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाला भेट दिली. नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी सभागृहातील वैशिष्ट्यांची विस्तृत माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन जगाचे लक्ष वेधलेल्या दीक्षाभूमीला सुद्धा यावेळी सर्व महापौरांनी भेट दिली. देशातील सर्वात मोठे स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत माहिती यावेळी जाणून घेतली. नागपूरवासीयांसाठी प्रेरणास्थळ असलेल्या व शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन याबद्दलची माहिती महापौरांनी जाणून घेतली.

अधिक वाचा : गरजू नागरिकांसाठी उपराजधानीत ‘अटल आरोग्य महाशिबीर’

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...