नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसाचाराचे गालबोट लागले. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडदरम्यान नियोजित मार्ग सोडला आणि त्यांनी दुसऱ्याच मार्गावरून ट्रॅक्टर घुसवले. या दरम्यान शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. बसची तोडफोड केली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टरने चाल केली. यामुळे शेतकरी आणि पोलिसांत जोरदार धुमश्चक्री उडाली. या हिंसाचारात १५० हून अधिक पोलिस जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. तर ट्रॅक्टर पलटी होऊन एका आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस स्थानकांत १५ एफआयआर नोंदवले आहेत.
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त किसान मोर्चाकडून प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तावित ट्रॅक्टर परेडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या किसान मोर्चासोबत अनेक बैठका झाल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ६ ते ७ हजार ट्रॅक्टर सिंघू सीमेवर एकत्र जमले होते. पण त्यांनी निश्चित केलेल्या मार्गावरून न जाता त्यांनी मध्य दिल्लीच्या मार्गाने चाल केली. आंदोलकांना अनेकवेळा विनंती करुनही त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. गाजीपूर आणि टीकरी सीमेवर अशाच प्रकारे परिस्थिती उद्बभवली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेतकऱ्यांचा एक गट हिंसक झाला. त्यांनी तोडफोड केली. पोलिसांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अटींचे उल्लंघन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी ई. सिंघल यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी ठरलेल्या वेळेपूर्वीच ट्रॅक्टर परेड सुरु केली. त्यांनी हिंसा आणि तोडफोड केली.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला. आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला. तसेच पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकर्त्यांनी काही ठिकाणी तलवारी उपसल्या. तर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात अनेक पोलिस आणि शेतकरी जखमी झाले आहेत.