नागपूर: दिल्लीहून आलेले बारा प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आंतरराज्यीय प्रवास धोक्याचा ठरत असल्याची शक्यता बळावली आहे. या सर्वांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर बुधवारी चाचणी करण्यात आली होती. गुरुवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. बाधितांच्या संपर्कातील सर्वांना कोव्हिड मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याबाबत मनपा प्रशासनाद्वारे सूचना देण्यात येत आहेत.
विमानतळ प्रशासनाद्वारे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. नागपूर शहरात आलेले अहमदाबाद येथील २४, दिल्ली येथील ७९ अशा एकूण १०३ प्रवाशांकडे चाचणीचा रिपोर्ट नव्हता. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली असता यामधील १२ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना ताप, खोकला किंवा अन्य संबंधित लक्षणे आढळल्यास त्यांची अँटिजन चाचणी केली जात आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना जाऊ देण्यात येत आहे. मात्र, चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला मनपाच्या पाचपावली कोव्हिड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय, रुग्णाला लक्षणे जास्त असल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. महापालिकेद्वारे रेल्वे स्टेशनवर १२०० जणांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी चारजणांची अँटिजन चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.
विमानळावर १२०० रुपये, रेल्वेस्टेशनवर नि:शुल्क
राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा या चार राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा नियम सारखा असला तरी विमानतळावर करोना चाचणीसाठी १२०० रुपये भरावे लागत आहेत, तर नागपूर रेल्वेस्थानकावर करोना चाचणी नि:शुल्क करण्यात येत आहे. विमानतळावर चाचणी झाल्यानंतर क्वारन्टाइन करण्याचे बंधन नसल्याने या प्रवाशांद्वारे संक्रमण होण्याची भीती नाकारता येत नाही.
दिल्ली येथील संसर्गाची दुसरी लाट सर्वांसाठी धोक्याचा घंटा ठरलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. जे प्रवासी चाचणी न करता येत आहेत त्यांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. या अंतर्गत बुधवारी एकूण ६३ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी गोविंद राठोड यांनी ‘मटा’ला दिलेल्या माहितीनुसार,’चाचणीसाठी प्रत्येकाकडून बाराशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. चाचणीचा अहवाल गुरुवारी सायंकाळपर्यंत मिळाला नाही. अशा स्थितीत प्रवाशाने स्वत:हून क्वारन्टाइन रहावे की नाही, याबाबत कुठलाही स्पष्ट आदेश नाही. विमानतळावर चाचणी केल्यानंतर प्रवाशांना होम क्वारन्टाइन होण्यासाठी स्टॅम्पिंग करण्यात येत नाही. महापालिकेच्या क्वारन्टाइन सेंटरमध्ये ठेवण्याची सुविधादेखील उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामत: चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नाही. जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर प्रवाशामुळे होणारे संक्रमण कुणीही थांबवू शकणार नाही.’