‘सच्चे दोस्त’ बनण्यासाठी तरुणाईला आवाहन

 ‘माय हार्ट माय नागपूर’च्या माध्यमातून मिळणार विधायक कार्याला प्रोत्साहन

नागपूर 

नागपूर ता१७ : नागपुरातील विवेकानंद स्मारकावर ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या दिवशी तरुणाईला आश्चर्याचा धक्का बसला. आकर्षक स्वरूपातील ‘माय हार्ट माय नागपूर’ हा सेल्फी प्वाईंट बघून तरुणाईने एकच गर्दी केली. सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. मात्र, यामागे असलेल्या सामाजिक हेतूला आणि अभिनव संकल्पनेला जाहीर करताच तरुणाईच्या नोंदणीसाठी उड्या पडल्या. आवाहनानंतर पहिल्याच दिवशी उपस्थित तरुणाईने ‘सच्चे दोस्त’ बनण्याचा संकल्प केला.

            नागपूर शहर हे आपले शहर आहे. या शहरासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी जे विधायक कार्य करतो, ते आता मनपाच्या सहकार्याने करून माझ्या शहराच्या विकासात करेन आणि शहर देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्यासाठी योगदान देईल, असा संकल्प आज तरुणाईने केला. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी १४ फेब्रुवारी रोजी अंबाझरी येथील विवेकानंद स्मारक येथे ‘माय हार्ट माय नागपूर’ ह्या सेल्फी प्वाईंट उभारल्यानंतर यामागील संकल्पना १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर करण्याचे ठरविले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी सायंकाळी तरुणाईने विवेकानंद स्मारक येथे एकच गर्दी केली. या गर्दीचे आभार मानत उपमहापौर मनीषा कोठे यांनी नव्या उपक्रमाची जाहीर घोषणा केली. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे यांच्यासह धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका परिणिता फुके यांची उपस्थिती होती.

काय आहे सच्चा दोस्त

            तरुणाईला जबाबदारीची जाणीव आहे. अनेक विधायक कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. अनेक अफलातून कार्य तरुणाई करीत असते. विविध सामाजिक उपक्रमात योगदान देत असते. अशा तरुणाईला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी ‘सच्चा दोस्त’ ही संकल्पना मांडली. आपण करीत असलेल्या कामाची माहिती द्या. गुगल फॉर्म भरून आपण आपली संपूर्ण माहिती दिली की नागपूर महानगरपालिका या सर्वांना एका मंचावर आणेल. त्यांच्या कामाची माहिती नागपूरकरांना करवून देत नागपूरच्या विकासासाठी त्यांचा उपयोग कसा करता येईल, याची माहिती एका कार्यक्रमातून देण्यात येईल. नोंदणी केलेले सर्व व्यक्ती ‘सच्चे दोस्त’ बनतील. हा उपक्रम नव्हे तर ही एक विधायक चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून नागपूर देशात क्रमांक एकचे शहर बनविण्याचा महापौर संदीप जोशी यांचा मानस आहे. आपल्या शहराविषयी आत्मीयता निर्माण झाल्याशिवाय हे शक्य नाही, म्हणूनच ‘माय हार्ट माय नागपूर’ च्या माध्यमातून ही ‘सच्चे दोस्त’ ही चळवळ उभारण्यात येत असल्याचे उपमहापौर मनीषा कोठे यांनी जाहीर केले.

उपमहापौरांचे आवाहन आणि तरुणाईची धमाल

            विवेकानंद स्मारकावर तरुणाई एकवटली. आर. जे. सौरभ, आर. जे. दिव्या, आर. जे. राजन, आर. जे. पल्लवी यांनी तरुणाईचे चांगलेच मनोरंजन केले. हे करतानाच त्यांना नागपूर शहराविषयी किती माहिती आहे, याची परिक्षाही घेतली. सामाजिक जाणीवा असलेल्या तरुणाईने प्रश्नांची उत्तरे देत बक्षिसे तर जिंकलीच मात्र, युवा महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘सच्चे दोस्त’ चळवळीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुरू केली.

सच्चे दोस्त’ बनण्यासाठी काय कराल?

            नागपूर महानगरपालिकेचे सच्चे दोस्त बनण्यासाठी ‘नागपूर म्युनिसिपल कार्पोरेशन’ या फेसबुक पेजला भेट द्या. तेथे ‘सच्चा दोस्त’ चळवळीत सहभागी होण्यासाठी क्यू आर कोड आणि लिंक दिली आहे. क्यू आर कोड स्कॅन करून अथवा लिंक क्लिक केल्यानंतर येणारा फॉर्म भरा आणि सबमीट करा. लवकरच नागपूर महानगरपालिका या सर्व सच्च्या दोस्तांना एका मंचावर आमंत्रित करून पुढील कार्यक्रम जाहीर करणार आहे.

हिरो ऑफ द मंथची घोषणा

           ‘सच्चे दोस्त’ चळवळीच्या माध्यमातून निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या तरुणाईला पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली. वर्षभर ह्या चळवळीच्या माध्यमातून कार्य होणार असून प्रत्येक महिन्याला नागपूर महानगर पालिका आणि अंकुर सीडस्‌तर्फे ‘हिरो ऑफ द मंथ’ असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे सत्काराचे स्वरूप असेल. स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत अशा दोन वर्गवारीत हे पुरस्कार पुढील वर्षभराकरिता देण्यात येणार आहेत.